भारतीय इतिहासात अशी अनेक व्यक्तिमत्त्व होऊन गेलीत जी केवळ त्यांच्या काळातपुरती नाही तर पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरत आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे असंच एक प्रेरणादायी नाव. त्यांची दूरदृष्टी, जाज्वल्य देशभक्ती आणि लोकांशी असलेली घट्ट नाळ आजही देशातील तरुण, विद्यार्थी आणि विचारवंतांना प्रेरणा देत आहे.
या ब्लॉगमध्ये जर लोकमान्य टिळक आज असते तर? या विषयावर आधारित परीक्षांसाठी आणि स्पर्धांसाठी उपयुक्त असा एक निबंध आणि भाषण आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर काही अंतिम विचार, जे या विषयाचं सार तुमच्या मनात ठसवून जातील.
निबंध: लोकमान्य टिळक आज असते तर?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक तेजस्वी, कणखर आणि विचारवंत नेतृत्व होते.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” ही त्यांची घोषणा आजही देशभक्ती जागवते. टिळक हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते एक शिक्षक, लेखक, समाजसुधारक आणि लोकजागरण करणारे महान व्यक्तिमत्व होते.
खरंच जर लोकमान्य टिळक आज आपल्यात असते तर काय झालं असतं?
आजच्या काळात भारत अनेक अडचणींना सामोरा जात आहे. शिक्षणातील असमतोल, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता आणि सर्वात मोठी बाब म्हणजे देशभक्तीतील कमी पडणारी भावना.
जर टिळक आज असते तर त्यांनी भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, आणि राजकीय अस्थिरतेविरोधात जोरदार लढा दिला असता. त्यांनी युवकांना समाजहिताचा आणि राष्ट्रहिताचा विचार करायला शिकवलं असतं, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करायला प्रेरित केलं असतं आणि शिक्षणव्यवस्थेत मोलाचे बदल घडवले असते.
टिळकांनी ‘गणेशोत्सव‘ आणि ‘शिवजयंती‘ सारख्या सार्वजनिक सणांद्वारे समाजाला एकत्र आणलं. आजही ते असते, तर त्यांनी सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी नव्या माध्यमांचा योग्य वापर केला असता. ते धर्म, जात, भाषेच्या भिंती ओलांडून भारतातील प्रत्येक माणसाला एकत्र बांधण्याचं काम करत राहिले असते.
आजचे राजकारण हे अनेक वेळा स्वार्थ, खोटी आश्वासने आणि दिशाहीनतेने भरलेले आहे. परंतु टिळकांचे राजकारण हे लोकहिताचे होते. त्यांनी राजकारणात नैतिकता, सच्चाई आणि नीतिमत्ता यांना सर्वोच्च स्थान दिले असते. त्यांचा ठाम विश्वास होता की देशाची प्रगती ही लोकांच्या शिक्षण, जागृती आणि संघटनातून होते.
आजचे विद्यार्थी जर टिळकांप्रमाणे विचार करू लागले, तर भारत एक प्रगत, एकसंध आणि स्वाभिमानी राष्ट्र म्हणून उदयास येईल.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, आज लोकमान्य टिळक नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्यात आहेत. आपण त्यांचे विचार आपल्या आचारात उतरवले, तर आपणच टिळकांच्या स्वप्नांचा भारत निर्माण करू शकतो.
भाषण: लोकमान्य टिळक आज असते तर?
(४ ते ५ मिनिटांचे भाषण)
आदरणीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो,
सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार!
आज मी तुमच्यासमोर “लोकमान्य टिळक आज असते तर?” या विषयावर माझे विचार मांडणार आहे.
मित्रांनो टिळकांना आपण सर्वच जाणतो. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” ही गर्जना करणारा आवाज आजही आपल्या कानात घुमतो.
टिळक म्हणजे केवळ एक नेता नव्हते, ते विचारांचे वणवे होते. ते एक लेखक होते, शिक्षक होते, समाजसुधारक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या मनात आशा जागवणारे महान देशभक्त होते. अश्या अष्टपैलू लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना आपण विसरूच शकत नाही.
मित्रांनो, आता कल्पना करूया की, जर आज लोकमान्य टिळक असते तर? तर… परिस्थिती अगदीच वेगळी असती.
आजचा भारत वेगळा दिसला असता. आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत, शिक्षणात असमानता, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सामाजिक विषमता, आणि सर्वात मोठं म्हणजे देशप्रेमाची उणीव आहे.
पण टिळक आज असते तर त्यांनी समाजहिताचा आणि राष्ट्रहिताचा विचार केला असता. त्यांनी राजकारणात सत्य, प्रामाणिकपणा आणि खऱ्या सेवाभावाला प्राधान्य दिलं असतं. त्यांचं नेतृत्व हे केवळ भाषणात नसून कृतीत दिसलं असतं आणि आपल्यासमोर एक आदर्श राजकारणी म्हणून ते उभे राहिले असते.
जर आज टिळक असते तर त्यांनी शाळा-कॉलेजात विद्यार्थ्यांवर फक्त परीक्षेचा ताण न देता, विचारांना चालना देणारे शिक्षण दिलं असतं. आज जिथे विद्यार्थी केवळ मार्कांच्या शर्यतीत धावतात, तिथे टिळक असते तर त्यांनी विचारक्षम, जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिक घडवण्यावर भर दिला असता.
आज अनेकदा असं दिसतं की लोकं स्वार्थासाठी देशाला विसरतात. पण जर लोकमान्य टिळक आज असते तर त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्तीचं बीज पुन्हा पेरलं असतं. “तुम्हीच देशाच्या भविष्याचे कळसूत्री आहात. फक्त करिअर नाही, तर कर्तव्यही महत्त्वाचं आहे.” असा संदेश त्यांनी युवकांना दिला असता. त्यांनी सोशल मिडियाचा वापर फक्त रील्ससाठी नव्हे तर विचारांची क्रांती घडवण्यासाठी केला असता.
टिळकांचं आणखी एक मोठं योगदान होतं ते म्हणजे लोकांना एकत्र आणायचे. आज आपल्याकडे जाती-धर्माच्या नावावर भिंती उभ्या राहतात. पण टिळकांनी ‘गणेशोत्सव‘ आणि ‘शिवजयंती‘ सारख्या सणांद्वारे समाजाला एकत्र आणलं होतं. आजही त्यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत‘ या संकल्पनेसाठी असेच नवे मार्ग शोधले असते जे आपल्याला एकत्र आणतात, जोडतात, तोडत नाहीत.
शेवटी एवढंच सांगावस वाटतं, लोकमान्य टिळक आज असते तर त्यांनी आपल्या प्रत्येकाला ‘लोकमान्य’ बनवलं असतं.
त्यांच्या विचारांनी आपल्यात आत्मविश्वास, नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने देशभक्ती निर्माण झाली असती.
म्हणूनच मित्रांनो, आज टिळक नसले तरी त्यांच्या विचारांची मशाल अजून पेटती आहे.
आणि जर आपण त्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवलं, तर आपणच त्या लोकमान्यांच्या स्वप्नांचा भारत घडवू शकतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
धन्यवाद!
शेवटचे विचार
लोकमान्य टिळक हे इतिहासात अडकून पडलेलं नाव नाही, तर ते प्रेरणादायी विचारसरणीचं जिवंत प्रतीक आहे.
या ब्लॉगमधून तुम्हाला भाषण आणि निबंध अश्या दोन्ही स्वरूपात त्यांची महती समजली असेलच.
जर आज टिळक असते तर त्यांनी विचारांचा लढा पुन्हा एकदा उभारला असता. पण आज त्यांचा विचार आपल्यात आहे आणि आपण त्या विचाराचे शिपाई आहोत. धन्यवाद!