इयत्ता १० वीच्या मराठी परीक्षेत वैचारिक निबंध लेखन हा उपयोजित लेखन विभागातील ८ गुणांचा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. अनेक वेळा या निबंधासाठी थेट विषयासोबत मुद्देही दिलेले असतात. या निबंधात विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर थेट अथवा मुद्यांच्या आधारे स्वतःचे विचार तार्किक, सुसंगत आणि प्रभावी पद्धतीने मांडायचे असतात. योग्य रचना, स्पष्ट विचार आणि सोपी भाषा वापरल्यास या निबंधात चांगले गुण मिळवता येतात.
Table of Contents
वैचारिक निबंध म्हणजे काय?
वैचारिक निबंध म्हणजे एखाद्या विषयावर आपले विचार, मत, दृष्टिकोन आणि निष्कर्ष मांडणारा निबंध.
या निबंधात:
- भावनांपेक्षा विचारांना महत्त्व असते
- विषयाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू मांडले जातात
- शेवटी योग्य निष्कर्ष दिला जातो
वैचारिक निबंध लेखनाची वैशिष्ट्ये
- भाषा सोप्या व स्पष्ट शब्दांत असावी
- विचारांमध्ये सुसंगती आणि क्रमबद्धता असावी
- उदाहरणे दिल्यास निबंध प्रभावी होतो
- अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन टाळावे
वैचारिक निबंधाची रचना
प्रस्तावना
- विषयाची थोडक्यात ओळख करून देणे
- विषय का महत्त्वाचा आहे हे सांगणे
मुख्य भाग
- विषयाचे विविध पैलू मांडणे
- कारणे, परिणाम, उदाहरणे देणे
- विचारांमध्ये सुसंगती असावी
समारोप
- विषयाचा थोडक्यात सारांश
- सकारात्मक संदेश किंवा निष्कर्ष
मुद्द्यांवर आधारित वैचारिक निबंध कसा लिहावा?
परीक्षेत कधी कधी निबंधासाठी मुद्दे दिलेले असतात. अशा वेळी:
- प्रश्न नीट वाचवा
- दिलेले मुद्दे आधी समजून घ्यावे
- प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र विचार मांडावे
- मुद्द्यांचा क्रम बदलू नये
- प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र परिच्छेद लिहावा
- अनावश्यक कथा किंवा भावना टाळणे
नमुना वैचारिक निबंध (मुद्द्यांवर आधारित)
प्रश्न :
पर्यावरण संरक्षण या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. (गुण ८)
मुद्दे :
– पर्यावरणाचे महत्त्व
– पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास
– संरक्षणाची गरज
– नागरिकांची जबाबदारी
पर्यावरण संरक्षण
पर्यावरण हे मानवी जीवनाचे आधारस्तंभ आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सुपीक जमीन, वनस्पती आणि प्राणी यांमुळेच पृथ्वीवर जीवन टिकून आहे. मानव आणि निसर्ग यांचे नाते अतूट असून एकमेकांवर अवलंबून आहे. पर्यावरण संतुलित असेल तरच मानवाचे जीवन निरोगी आणि सुखकर राहू शकते.
परंतु आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे औद्योगिकीकरण, बेसुमार वृक्षतोड आणि विविध प्रकारचे प्रदूषण यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला आहे. वायू, जल व ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. हवामानातील बदल, तापमानवाढ, दुष्काळ व अतिवृष्टी यांसारख्या समस्या वाढत चालल्या आहेत.
म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरण वाचले तरच पृथ्वी सुरक्षित राहील आणि मानवाचे भविष्य उज्ज्वल होईल. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. अधिकाधिक झाडे लावणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, स्वच्छता राखणे अशा छोट्या कृतींमधून मोठा बदल घडवता येतो. आज पर्यावरणाचे संरक्षण केले तरच उद्याची पिढी सुरक्षित राहील.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी टिप्स
- निबंध १½ ते २ पानांचा लिहा
- सोपी आणि शुद्ध भाषा वापरा
- विषयाशी संबंधित उदाहरणे द्या
- निष्कर्ष सकारात्मक असावा
विद्यार्थ्यांच्या सामान्य चुका
- मुद्दे वगळणे
- विषयाबाहेर लिहिणे
- खूप जड शब्द वापरणे
- निष्कर्ष न लिहिणे
- विचारांमध्ये विस्कळीतपणा ठेवणे
स्पष्ट विचार, योग्य रचना आणि सोपी भाषा वापरल्यास वैचारिक निबंध लेखनात उत्तम गुण मिळवता येतात.